40% पेक्षा जास्त उच्चार, भाषा अपंग असलेल्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस अभ्यासक्रमात प्रवेश नाकारता येणार नाही – सर्वोच्च न्यायालय
सुप्रीम कोर्टाने 40-45% भाषा दिव्यांग असलेल्या उमेदवारांना देखील एमबीबीएस प्रवेशासाठी पात्र मानले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका आदेशात यामागचे कारणही दिले आहे. न्यायमूर्ती बी.आर.गवई आणि के.व्ही.विश्वनाथन यांच्या खंडपीठाने सांगितले की, “केवळ बेंचमार्क अपंगत्वामुळे उमेदवाराला एमबीबीएस अभ्यासक्रम करण्यापासून रोखता येत नाही. उमेदवार वैद्यकीय शिक्षण घेण्यास सक्षम नसल्याचा अहवाल अपंगत्व मूल्यांकन मंडळाने जारी केला पाहिजे.”सर्व प्रकारच्या दिव्यांग उमेदवारांना वैद्यकीय शिक्षणातून वगळणारे NMC चे (नॅशनल मेडिकल कमिशन) नियम अतिशय कडक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. न्यायालयाने NMC ला हे नियम बदलण्याचे आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी अधिक समावेशक आणि आश्वासक दृष्टिकोन स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत.
एका याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने 45% भाषा अपंगत्व असलेल्या उमेदवाराला एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्याची परवानगी दिली आहे. उमेदवार वैद्यकीय शिक्षण घेण्यास सक्षम आहे, त्यामुळे त्याला प्रवेश दिला जाऊ शकतो, असे न्यायालयाने स्थापन केलेल्या वैद्यकीय मंडळाने म्हटले होते. रिक्त असलेल्या जागेवर उमेदवाराला प्रवेश देण्यात यावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.