38 शाळांमधील 154 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचे आदेश…
परभणी जिल्ह्यातील शिक्षण विभागात गाजलेल्या बोगस नोकर भरती प्रकरणी तत्कालीन दोन्ही शिक्षणाधिकारी यांच्यांवर कारवाई नंतर आता शिक्षण उपसंचालकांनी थेट 38 शाळांमधील 154 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचे आदेश काढल्याने खळबळ उडाली आहे, महत्त्वाचे म्हणजे यांना देण्यात आलेल्या वेतनाच्या वसूली बरोबरच या बोगस शिक्षक भरती तील दोषींवर कारवाई करण्याचे ही आदेश काढण्यात आले आहे.
ही भरती जावक क्रमांकामध्ये फेरफार करत चुकीच्या पद्धतीने भरती झाल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्ह्यात भरती झालेले 154 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचे आदेश काढण्यात आले आहे.
परभणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून २०१५-१६, २०१६-१७ व २०१७-१८ या काळात तीन वर्षामध्ये जावक क्रमांकामध्ये उपरीलेखनाच्या नोंदी घेत संबंधितांच्या संचिकांना मान्यता देण्यात आल्याचे नमूद केले. या नोंदीनुसार १५४ जणांना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी थेट नोकरी मिळवली होती.
नोंदविलेल्या जावक क्रमांकाच्या खाली रिकाम्या असलेल्या जागेवर उपजावक क्रमांक टाकून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याची नोकरी मिळविणाऱ्या १५४ जणांच्या सेवा समाप्तीचे आदेश शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी नुकतेच काढले आहेत. त्याशिवाय संबंधितांना देण्यात आलेल्या वेतनाची वसुली, दोषी असलेल्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
