भुसावळ शिक्षक पतसंस्था घोटाळ्यात १६ संशयितांना न्यायालयीन कोठडी तर ४६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
भुसावळ येथील प्राथमिक शिक्षक नूतन पतसंस्था मर्या. मध्ये तब्बल ९.९० कोटी रुपयांचा बनावट कर्ज वाटप घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणात १६ संशयितांना अटक करण्यात आली असून एकूण ४६ व्यक्तींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासकीय लेखा परीक्षक प्रकाश चौधरी यांच्या तक्रारीवरुन सोमवारी गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणात आर्थिक गुन्हा शाखेने १६ संशयितांना ताब्यात घेऊन जळगाव शहर पोलिस ठाण्याच्या ठेवले होते.संचालक मंडळ व कर्मचारी अशा १६ जणांना आर्थिक गुन्हा शाखेने न्यायालयात हजर केले. पोलिसांनी ७ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती.
आर्थिक गुन्हा शाखेचे निरीक्षक संदीप पाटील यांनी संशयितांना भुसावळ कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधिश एस.बी. तिवारी यांच्या कोर्टात हजर केले. पोलिसांतर्फे या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे, अनेक संशयितांना अद्याप ताब्यात घेणे बाकी आहे. घोटाळ्यात कोणाचा कसा सहभाग आहे याचा शोध घ्यायचा असल्याने संशयितांना ७ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. त्यावर सरकारी व आरोपींच्या वकिलांमध्ये अडीच तास युक्तीवाद चालला. कोर्टाने सर्व संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
घोटाळा प्रकरणी रमेश चिंधू गाजरे व ४५ जणांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यात १४ विद्यमान संचालक आहेत. यातील ५ संचालक हे घोटाळ्याच्या कालावधीत तत्कालीन सभापती होते. एक विद्यमान सभापती आहेत. चार महिला संचालिका आहेत. तसेच एच.आर. वायकोळे आणि कंपनी सनदी लेखापाल, भुसावळ, तत्कालीन हिशेबनीस, नऊ लिपिक, तीन शिपाई तसेच जेडीसीसी बँकेच्या सात कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.