६ लाख ५६ हजार वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देणार – मुख्यमंत्री शिंदे
राज्यातील वंचित ६ लाख ५६ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी आज विधानसभेत केली.
शेतकऱ्यांसाठी सरकारने काय केलं या प्रश्नावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरत होते.त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही कमी कलावधीत अधिक मदत केली.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ मध्ये ४४ लाख शेतकऱ्यांना १८ हजार ७६२ कोटी इतका कर्जमाफीचा लाभ मिळाला होता. पण सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी झाली, त्यामुळे ६ लाख ५६ लाख शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले होते.
अवकाळी पाऊस, गारपीट आणि बळीराजाच्या समस्यांसंदर्भात विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अल्पकालिन चर्चा उपस्थित केली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. गेल्या दीड वर्षांत आमच्या सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजाला तब्बल ४४ हजार २७८ कोटी रुपयांची आतापर्यंतची विक्रमी मदत केली.
राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचं पुनर्गठन करण्यात येणार आहे. तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी प्रति हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी आज विधानसभेत केली. आमचं सरकार दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे.
