२५ हजारांची लाच घेताना आरोग्य अधिकारी एसीबी च्या जाळ्यात…
यवतमाळच्या काळी दौलत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र आडे यांना आशा वर्करच्या जागेवर पदस्थापना देण्यासाठी २५ हजार रुपये लाच घेताना अटक करण्यात आली. ही कारवाई यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
डॉ. आडे काळी दौलत आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय त्यांच्याकडे काही काळ फुलसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचा अतिरिक्त प्रभारही होता. माळवागद या गावात आशा वर्कर या पदाच्या भरतीसाठी नुकतीच जाहिरात काढण्यात आली. या एका जागेसाठी गावातून जवळपास दहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
त्यात कोमल पृथ्वीराज चव्हाण या उच्चशिक्षित महिलेनेही आशा वर्कर पदासाठी अर्ज केला. मात्र, या पदावर पदस्थापना पाहिजे असल्यास ५० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी डॉ.आडे यांनी केली. कोमल चव्हाण यांचे पती यांनी डॉ.आडे यांची भेट घेऊन गुणवत्तेच्या निकषावर कोमल चव्हाण यांची निवड करण्याची विनंती केली.
परंतु, आडे यांनी ५० हजार रुपये दिल्याशिवाय पदस्थापना मिळणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर कोमलचे पती पृथ्वीराज चव्हाण यांनी यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
आडे यांनी मागितलेल्या ५० हजारांपैकी २५ हजारांची पहिली किस्त देण्याचे आज निश्चित होते. त्यानुसार कोमल व पृथ्वीराज चव्हाण ठरलेली रक्कम घेऊन सायंकाळी पाचला काळी (दौलत) प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचले. आडे यांनी लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने आडे यांना ताब्यात घेतले.
