अपडेटआंतराष्ट्रीयक्रीडाराष्ट्रीय

१०० ग्रॅम वजनाने स्वप्नभंगले,विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र

Share this post

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला चौथं पदक निश्चित झालंय असं वाटत असतानाच कुस्तीत महिलांच्या ५० किलो वजनी गटात कुस्तीपटू विनेश फोगट हिला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले. या मोठ्या निर्णयामागचे कारण म्हणजे ५० किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी तिचे वजन वाढले होते. विनेशचे वजन जास्त भरल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. विनेशचे वजन मर्यादेपेक्षा अंदाजे १०० ग्रॅम जास्त आहे, ज्यामुळे तिला अपात्र ठरवले आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, विनेश रौप्य पदकासाठीही पात्र होणार नाही.

विनेशने मंगळवारच्या लढतीसाठी वजन केले होते. नियमानुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. सर्व अडचणींना झुगारून अंतिम फेरीत पोहोचलेल्या या कुस्तीपटूचे वजन मंगळवारी रात्री अंदाजे २ किलो जास्त होते. ती रात्रभर झोपली नव्हती आणि निकष पूर्ण करण्यासाठी तिने जॉगिंगपासून स्किपिंग आणि सायकलिंगपर्यंत सर्वतोपरी प्रयत्न केले, पण ते अपुरे पडल्याने विनेशला आता अपात्र ठरवण्यात आले आहे.

मागील वर्षभर जंतरमंतरवरील आंदोलानमुळे प्रचंड टीकेचा सामना करावा लागणाऱ्या विनेशने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या कामगिरीच्या जोरावर सर्वांना सडेतोड उत्तर दिले. ५० किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये तिने प्रवेश करून इतिहास घडवला. ऑलिम्पिकमध्ये कुस्तीची फायनलमध्ये प्रवेश मिळवणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू ठरली.

विनेश, तिचे प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफसाठी कालची रात्र आव्हानात्मक होती. विनेशने वजन कमी करण्यासाठी काही खाल्ले नाही किंवा पाणीही प्यायली नाही. सर्व उपाय करून झाल्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून विनेशचे केसही कापले गेले आणि रक्तही काढले गेले. पण तरीही अपयश आले.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *