अपडेटमहाराष्ट्र

स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये महाराष्ट्र राज्याला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार…

Share this post

स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये राज्याला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.मध्यप्रदेश आणि छत्तीसगड दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी राहिले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान केले.स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत शहरं कचरा डेपोमुक्त केली जात असल्याबद्दल राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केलं.स्वच्छता टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सफाई मित्रांचे त्यांनी आभार व्यक्त केले.

१ लाखांहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये सासवड पहिल्या आणि लोणावळा तिसऱ्या स्थानी राहिलं.याशिवाय कराड,पाचगणी आणि विटा या शहरांनीही स्वच्छ शहरांचे पुरस्कार पटकावले.गडहिंग्लज,विटा,देवळाली आणि सिल्लोड या शहरांनी मानांकनात स्थान मिळवलं.

१ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये इंदूरनं सलग सातव्यांदा पहिला पुरस्कार मिळवला,तर नवी मुंबईला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.कचरामुक्त शहराचं सर्वोच्च ‘सप्ततारांकित’मानांकन मिळविणाऱ्या देशातल्या २ शहरांपैकी एक नवी मुंबई आहे.हागणदारीमुक्त श्रेणीत सर्वोच्च ‘वॉटरप्लस’मानांकनही नवी मुंबईनं कायम राखलं आहे.

पुणे महानगरपालिकेला ५ स्टार मानांकन आणि पिंपरी चिंचवडला ५ स्टार मानांकनासह वॉटरप्लस मानांकन मिळाले आहे.यामुळे देशातील पहिल्या दहा उत्कृष्ट स्वच्छ शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील ८ शहरांनी स्थान मिळवून अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

स्वच्छ सर्वेक्षणात सुमारे साडे ४ हजार शहरातल्या १ लाख ठिकाणांची पाहणी झाली आणि १२ कोटी नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्याची माहिती नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली.गेल्या दहावर्षात वैज्ञानिक पद्धतीनं कचरा व्यवस्थापनाचं प्रमाण १६ वरुन ७६ टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती त्यांनी दिली.स्वच्छ सर्वेक्षण २०२३ पुरस्कारांमध्ये प्राप्त केलेल्या यशाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेचे,महानगरपालिका,सर्व नगरपरिषदा,नगरपंचायतींचे अभिनंदन केले आहे. राज्यातल्या स्वच्छता प्रेमी नागरिकांच्या योगदानातून, आणि सफाई, स्वच्छता कामगारांच्या मेहनतीमुळे आपण हे अव्वल स्थान पटकावले आहे, असं ते म्हणाले.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *