सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १११ जागांवर प्राध्यापक भरती…
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागामधील प्राध्यापकांच्या रिक्त असलेल्या 111 पदांच्या भरती प्रक्रियेला १ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. विद्यापीठातर्फे रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांची प्रतीक्षा संपली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
विद्यापीठात बऱ्याच काळात प्राध्यापक भरती न झाल्याने, विविध शैक्षणिक विभागांमध्ये निम्म्यापेक्षा अधिक प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. काही विभागांमध्ये तर, केवळ एक किंवा दोन पूर्णवेळ प्राध्यापक कार्यरत आहेत. त्यामुळे विद्यापीठात पूर्णवेळ अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकांची संख्या खूपच कमी झाली आहे. त्यामुळे विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता खालावण्यासह विद्यापीठाच्या क्रमावरीवरही परिणाम झाला आहे. मंजूर पदांपैकी रिक्त जागांवर भरती होत नसल्याने विद्यापीठाला कंत्राटी तत्वावर १३३ प्राध्यापकांची भरती प्रक्रिया राबवावी लागली. मात्र आता १११ पदांची भरती होणार असल्याने विद्यापीठाला दिलासा मिळणार आहे.
विद्यापीठातील रिक्त जागांसाठी इच्छुक उमेदवारांना येत्या १ जानेवारी पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ जानेवारी आहे.
अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.


