शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल १५ दिवसात सुरू होणार – मंत्री केसरकर
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती सुरू होईल, अशी घोषणा केल्यानंतरही सुमारे वर्षभरापासून रखडलेल्या शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला आणखी १५ दिवस थांबावे लागणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत सांगितले आहे. येत्या १५ दिवसात पवित्र पोर्टल सुरू होईल,असे केसरकर यांनी शिक्षकांच्या रिक्त पदावर भरतीच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
राज्यात शिक्षक भरती केव्हा होणार ? असा प्रश्न बेरोजगार युवकांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत विधान परिषदेत व विधान सभेत लोकप्रतिनिधी प्रश्न उपस्थित करत, अनेक शाळांमध्ये सध्या शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे असे सांगितले.
अनेक उमेदवार जिल्हा परिषदेच्या जाहिराती केव्हा प्रसिद्ध होणार याची वाट पाहत आहेत, याबाबत केसरकर म्हणाले, लवकरच जिल्हा परिषदेच्या जाहिराती प्रसिद्ध होतील. त्यानंतर उमेदवारांकडून त्यांचे चॉईस स्वीकारले जातील. उमेदवारांनी चॉईस दिल्यानंतर त्यांचे समुद्पदेशन करून त्यांना संबंधित ठिकाणी नियुक्त केले जाईल.


