शिक्षक पात्रता परीक्षेची (TET) घोषणा
शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्य परीक्षा परिषदेकडून शिक्षक पात्रता परीक्षेची (TET) घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून ३० सप्टेंबर ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आवश्यक असलेली शिक्षक पात्रता परीक्षा राज्य परीक्षा परिषदेतर्फे १० नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे.
राज्यातील पहिली ते आठवीच्या सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनांच्या अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक या पदांसाठी उमेदवार टीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. राज्यात पवित्र पोर्टल संकेतस्थळाद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्याची भरती अंतिम टप्प्यात आहे, तर दुसऱ्या टप्प्यात पदे भरण्यासाठी ही परीक्षा राबवण्यात येत आहे. राज्य परीक्षा परिषदेने बाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.
परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ३० सप्टेंबर पर्यंत अर्ज प्रक्रिया सुरू असणार आहे. २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत उमेदवारांना परीक्षेची प्रवेशपत्रे दिली जाणार आहेत. तर १० नोव्हेंबर रोजी परीक्षेतील पेपर १ सकाळी १०ः३० ते १ या वेळेत, तर दुपारी २ ते ४ः३० या वेळेत पेपर २ ची परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेचे अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने स्विकारले जाणार आहेत. अर्ज भरणे, शुल्क या बाबतची माहिती परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीच्या अधीन राहून उमेदवारांना परीक्षेला तात्पुरता प्रवेश देऊन निकाल घोषित केला जाईल. परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणावेळी करण्यात येईल. प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास किंवा उमेदवार प्रमाणपत्रे सादर करू न शकल्यास परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल. ऑनलाइन अर्जातील माहिती आणि मूळ कागदपत्रांत तफावत आढळल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल, असे राज्य परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.