शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या एकूण 4 जागांसाठी निवडणूकीचे नवीन वेळापत्रक जाहीर
26 जूनला शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या एकूण 4 जागांसाठी मतदान होणार आहे व 1 जुलै रोजी मतमोजणी पार पडणार आहे.
यापूर्वी याचं निवडणुकीची तारीख 10 जून ठरवण्यात आली होती. मात्र शाळांच्या सुट्ट्या संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी शिक्षक, पदवीधर संघटनांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. ज्यामुळे निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्यात आली.
आता निवडणूक आयोगाने निवडणुकीचे नविन वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, येत्या 26 जूनला शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 4 जागांसाठी मतदान होणार आहे. तसेच, 1 जुलैला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यावर शिक्षक, पदवीधर संघटनांनी आक्षेप नोंदवला होता. तसेच, या संघटनांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती की, “शाळांना सुट्टी असल्यामुळे त्याचा परिणाम थेट निवडणुकीवर होईल. शाळांमधील उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर निवडणुका घेण्यात याव्यात”
या मागणीच्या आधारावरच आयोगाने अनिश्चित काळासाठी निवडणुका पुढे ढकलली होती. दरम्यान, येत्या 7 जुलै रोजी मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण शिक्षक आणि नाशिक पदवीधर या जागांचा कार्यकाळ संपत आहे. यामुळेच निवडणूक आयोगाने या चार जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे.
