शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणार आश्र्वासित प्रगती योजनेचा लाभ,मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय…
राज्यातील खासगी मान्यताप्राप्त शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्र्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणार असून यासाठी ५३ कोटी, ८६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सोमवारी(ता.११) मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.
राज्यातील खासगी मान्यताप्राप्त शाळांमधील कर्मचाऱ्यांना आश्र्वासित प्रगती योजनेचा लागू करावी, अशी मागणी गेली अनेक वर्ष शिक्षकेतर महामंडळाच्या माध्यमातून शासनाकडे करण्यात येत होती. त्यासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा संघर्षाची भूमिका घेतली होती. सर्वच शिक्षक तसेच पदवीधर आमदार यांच्या नेतृत्वाखाली राज्य शिक्षकेतर महामंडळाने अनेक आंदोलने केली होती.
०१ जानेवारी २०२४ रोजी सेवेत असलेल्या व या ०१ जानेवारी २०२४ पूर्वी २४ वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना याचा प्रत्यक्ष लाभ १/१/२०२४ पासून मिळणार आहे.
अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १९९४ पासून कालबद्ध पदोन्नती देण्यात येते. राज्य शासनाने १ ऑक्टोबर २००६ पासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू केली आहे. याच धर्तीवर या शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील २ लाभांची ही योजना १ जानेवारी २०२४ पासून लागू करण्यात येईल.