शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी १ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ७ वर्ष कारावासासह १० हजार रुपयांचा दंड…
धाराशिवमध्ये शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी १ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी न्यायालयाने ७ वर्ष कारावासासह १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
शाळा सोडल्याचा मुळ दाखला व इयत्ता दहावीचे मुळ मार्क मेमो देण्यासाठी तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथील लक्ष्मीबाई बाबुराव पाटील कृषी तंञनिकेतनमधील कृषी सहायक अशोक दल्लु राठोड यांनी २०१५ मध्ये तक्रारदाराकडुन एक हजार रुपयांची लाच घेतली होती. या प्रकरणी तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
नऊ वर्षापासून न्यायालयात प्रकरणाबाबत सुनावणी सुरु होती. दरम्यान न्यायालयात गुन्हा सिध्द झाल्याने जिल्हा सत्र न्यायालयाने २८ मार्च रोजी अशोक राठोड यांना ७ वर्षे कारावास व १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणाचा निकाल तब्बल ९ वर्षांनी लागला आहे.


