व्हॉट्सअॅप चॅटवरुन वाद,तलाठ्याची डोळ्यात मिरची टाकून हत्या
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील आडगाव येथील तलाठी संतोष पवार हे त्यांच्या तलाठी कार्यालयात काम करत असताना प्रताप कराळे नामक तरुणाने कार्यालयात जात व्हाट्सअप्प ग्रुपवरील मेसेजवरुन वाद सुरु केला. त्यावर तलाठी पवार यांनी मी योग्यच टाकले जे टाकले असे प्रत्युत्तर दिले. त्यानंतर प्रताप कराळे नावाच्या युवकाने तलाठी पवार यांच्या डोळ्यात थेट मिर्चीची पूड टाकत चाकूने अनेक वार केले.
यावेळी तिथे असलेले तलाठी बालाजी डवरे यांनी कराळे यांना धरून चाकू हिसकावून घेत बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कराळे याने पोबारा केला. यानंतर तलाठी संतोष पवार यांना जखमी अवस्थेत परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. ही बाब कळताच परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह सर्वच महसूल अधिकारी कर्मचारी जिल्हा सामान्य रुग्णालयात एकत्र आले होते.
सर्व अधिकाऱ्यांसमोर पोलिसांनी यातील आरोपी प्रताप काळे याला अटक केलीय. आरोपी संतोष कराळे हा वारंवार तलाठी संतोष पवार यांना तुम्ही माझी जमीन इतरांच्या नावावर करून द्याल असे म्हणत त्रास देत होता. मात्र असं करता येत नसतं अस वारंवार सांगूनही आरोपीने ऐकले नाही. त्याने आज थेट पवार यांचा निर्दयीपणे खून केला.

