विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, शालेय पोषण आहाराच्या मसाल्यात आढळली मेलेली पाल
विद्यार्थ्यांचं आरोग्य सुदृढ राहावं म्हणून शासनाकडून विध्यार्थ्यांना पौष्टिक शालेय पोषण आहार पुरवला जातो. मात्र याच पोषण आहारात भ्रष्टाचार होत असेल तर विद्यार्थ्यांचे आरोग्य कसे सुदृढ राहणार ?
अनेकदा पोषण आहारात अळ्या, उंदीर, झुरळ अशी मेलेले कीटक आढळून आल्याचे प्रकार उघड झाले आहेत. मात्र तरीही प्रशासनाला किंवा शासनाला याचं गांभीर्य नसल्याचं दिसतंय.
अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यातल्या तळेगाव डवला गावात उघड झाला आहे. पोषण आहार बनविण्यासाठी लागणाऱ्या मसाल्यात मृत पाल आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. सुदैवाने आहारात मसाला टाकत असतांना हा प्रकार खिचडी बनवणाऱ्याच्या लक्षात आला आणि त्यांनी मुख्याध्यापकांना हा प्रकार दाखवल्याने पुढील अनर्थ टळला.
यापूर्वीही पोषण आहारात मृत पाल, उंदीर, झुरळ, अळ्या असे कीटक आढळल्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र तरीही हे प्रकार थांबत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा हे प्रकार कधी थांबतील असा प्रश्न पुन्हा एकदा या घटनेने विचारला जाऊ लागला आहे.
तेल्हारा गटशिक्षण अधिकाऱ्यांनी मसाल्याचं हे पॅकेट सिल केलं आहे. सील केलेले मसाल्याचे पाकीट पुढील तपासणी साठी अन्न व औषध प्रशासनाकडे पाठवण्यात आलं आहे.
या प्रकरणी शिक्षण विभागाकडून वरिष्ठांना अहवाल पाठविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. शालेय पोषण आहाराच्या पुरवठाधाराचा करारनामा पुणे येथील शिक्षण संचालकांनी केला आहे. या प्रकरणी पुढील चौकशीची प्रक्रिया सुरू असून शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे विभागाकडून सांगण्यात आले.