वाचन सुलभता वाढवण्यासाठी पुस्तकांचं डिजिटलीकरण करा – राज्यपाल रमेश बैस
वाचन सुलभता वाढवण्यासाठी अधिकाधिक पुस्तकांचं डिजिटलीकरण करावं अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली आहे.
मुंबईचं सांस्कृतिक वैभव असलेल्या एशियाटिक सोसायटीचा २१९ वा वर्धापन दिवस राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सोसायटीच्या सभागृहात झाला,त्यावेळी ते बोलताना नवी पिढी वाचनापासून दूर जात आहे हा चुकीचा समज असून,डिजिटल माध्यमं आल्यामुळे नवी पिढी वाचन सुलभता शोधत आहे. ग्रंथ वाचन बंद झालेलं नाही तर वाचण्याची पद्धत बदलली आहे,असं ते म्हणाले.
लाखो दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखिते, नाणी व नकाशांचा संग्रह असलेली एशियाटिक सोसायटी आपल्या अस्तित्वासाठी लढताना दिसत आहे. परंतु मुंबई हे दानशूर लोकांचे शहर आहे. मुंबई मॅरेथॉनच्या माध्यमातून शेकडो अशासकीय संस्था आपल्या सेवाभावी कार्यांसाठी मुंबईतून निधी संकलन करीत असतात. त्यामुळे निधीची कमी नाही, तर योग्य व्यक्तींकडे योग्य प्रस्तावासह पोहोचणे आवश्यक असल्याचे राज्यपाल यांनी यावेळी सांगितले.एशियाटिक सोसायटीने राज्यातील सर्व विद्यापीठांसोबत काम करावे, आपल्या भव्य जागेची पुनर्आखणी करावी व युवा वाचकांना साहित्य उपलब्ध करुन द्यावे, जगातील मोठमोठी ग्रंथालये स्वतःला कसे बदलत आहेत याचे अध्ययन करुन आपण त्यानुसार बदल करावे तसेच युवा पिढीला व कॉर्पोरेट सदस्यांना व्यवस्थापनात घ्यावे, अशा सूचनाही राज्यपालांनी यावेळी केल्या.एशियाटिक सोसायटीला अध्यक्ष म्हणून इतिहासकार, लेखक व संपादकांची परंपरा लाभली आहे. सोसायटीने स्वतःचा वार्षिक साहित्य उत्सव निर्माण करावा. संगीत समारोहाचे देखील आयोजन करावे. अनेक देश आज आपल्या देशातील ऐतिहासिक वारशाच्या माध्यमातून पैसे कमवत आहेत. एशियाटिक सोसायटीने आपले कार्य सुरु ठेवण्यासाठी आपले स्थापत्य व ग्रंथ वैभव जगापुढे आणावे अशी सूचना राज्यपालांनी केली.
वाचन सुलभता वाढवण्यासाठी जास्तीत जास्त पुस्तकांचं डिजिटलीकरण करा अशा सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी दिल्या.


