अपडेटधुळेलाचलुचपत कारवाई

लाच स्विकारताना धुळे महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी शुभांगी बनसोडे एसीबीच्या जाळ्यात…

Share this post

प्रवास भत्ता बिलाच्या रकमेच्या दहा टक्के ९३ हजाराची लाच मागणी आणि ५४ हजाराच्या लाचेचा स्विकार करणे धुळे जिल्ह्याच्या पिंपळनेर महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी शुभांगी बनसोडे यांना चांगलेच महागात पडले आहे. ५४ हजारांची लाच घेताना त्यांना एसीबी पथकाकडून रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या लाच प्रकरणातील तक्रारदार पंचायत समिती साक्री अंतर्गत, महिला बालकल्याण केंद्र, पिंपळनेर येथे पर्यवेक्षक या पदावर कार्यरत आहेत. तकारदार आणि त्यांचे इतर सहा कार्यालयीन सहकारी अशा सर्वांचे ९ लाख ३७ हजार ५३३ रुपये एकत्रित प्रवास भत्त्याचे बिल मंजूर करण्यात आले होते. या प्रवास भत्त्याची रक्कम प्रत्येकाच्या बँक खात्यात जमा झाली होती. त्यानंतर शुभांगी बनसोडे यांनी तक्रारदार आणि त्यांचे सहकारी कर्मचारी यांना त्यांच्या कक्षात बोलावून घेतले. प्रवास भत्ता मंजूर झालेल्या कर्मचाऱ्यांचा प्रवास भत्ता काढून दिल्याच्या मोबदल्यात प्रत्येकाकडून १० टक्क्यांप्रमाणे एकूण ९३ हजार रुपये जमा करण्यास सर्वांना बजावण्यात आले होते.

लाचेची ९३ हजार रुपयाची रक्कम जमा करून दिली नाही तर यापुढे भविष्यात प्रवास भत्त्याची बिले काढून दिली जाणार नाही, असे देखील शुभांगी बनसोडे यांनी संबंधित सहकारी कर्माचाऱ्यांना बजावले होते. त्यानंतर तक्रारदारांनी ६ मे २०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांच्याकडे आपली तक्रार दाखल केली. एसीबी विभागाच्या पडताळणी अंतिम लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. तक्रारदार यांनी प्रवासभत्ता जमा झालेल्या काही कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या जमा झालेल्या प्रवासभत्त्याच्या बिलाप्रमाणे दहा टक्के अशी ५४ हजार रुपयांची रक्कम जमा करून ती लाचेची रक्कम महिला अधिकारी शुभांगी बनसोडे यांना त्यांच्या कक्षात पंचासमक्ष देण्यात आली.

लाचेची रक्कम स्वतः स्विकारताना शुभांगी बनसोडे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, प्रविण मोरे, रामदास बारेला, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *