रिझर्व्ह बँकेकडून इचलकरंजीतील नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द…
भारतीय रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील आणखी एका बँकेवर कारवाऊ करत परवाना रद्द केला आहे. आरबीआयने कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरातील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईना कोणताच स्त्रोत नसल्याचे कारण देत आरबीआयने ही कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँकेने सोमवारपासून (४ डिसेंबर २०२३) सर्व बँकिंग व्यवहार बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
रिझर्व्ह बँकेने परिपत्रक काढून कोल्हापुरातील इचलकरंजी येथील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द केल्याची माहिती दिली.
दरम्यान या बँकेमध्ये जमा असलेल्या ग्राहकांच्या पैशाचा संदर्भात देखील त्यांनी पत्रकात माहिती दिलीय. बँक ग्राहकांना ठेवीदार विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर विमा संरक्षणाची सुविधा मिळते. DICGC ही भारतीय रिझर्व्ह बँकेची सब्सिडियरी आहे, जी ५ लाख रुपयांपर्यंत विमा सुविधा प्रदान करते. अशा परिस्थितीत ज्या ग्राहकांनी ५ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम बँकेत जमा केली आहे, त्यांना संपूर्ण पैसे परत मिळतील. तर ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असलेले ग्राहक केवळ ५ लाख रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी दावा करू शकतील.


