राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची थट्टा – बार्टी, सारथी आणि महाज्योती फेलोशीप परीक्षेत गोंधळ,परीक्षा रद्द करण्याची मागणी…
रविवारी बारटी, सारथी आणि महाज्योती या फेलोशिपसाठी राज्य सरकारने परीक्षा घेण्यात आल्या आहेत. राज्यभरात ही परीक्षा झाली आहे. मात्र या परीक्षेत एक वेगळाच गोंधळ पुढे आलाय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2019 मध्ये घेण्यात आलेल्या सेट परीक्षेतील प्रश्न जसेच्या तसे या परीक्षेसाठी विचारण्यात आले असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे या प्रश्नपत्रिकेत अगदी प्रश्नांचा क्रम सुद्धा तोच होता. 2019 मध्ये सेटसाठी जी परीक्षा घेण्यात आली होती तोच पेपर 2023 च्या या फेलोशिपच्या परीक्षेसाठी वापरण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सगळ्या प्रकारावर आता विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे.
अशातच ज्या विद्यार्थ्यांनी जुन्या पेपरच्या माध्यमातून अभ्यास केला आहे त्यांना या परीक्षेत पूर्णपैकी पूर्ण गुण मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. यातून राज्य सरकारने नवा पेपर काढण्याचीही तसदी घेतली नसल्याचे पुढे आलं आहे. फक्त जुना पेपर कॉपी करून 2023 साठी पेस्ट करण्यात आल्याचे समोर आले आहे. आता खरंच या परीक्षेचा जो निकाल लागेल त्यातून गुणवत्ता पुढे येणार का असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला जातोय.
सारथीच्या पीएचडी धारकांना सरसकट फेलोशिप द्यावी, यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘विद्यार्थी पीएचडी करून काय दिवे लावणार आहेत का ?’ असा सवाल अधिवेशनात उपस्थित केला होता. या संस्थांच्या माध्यमातून प्रत्येकी दोनशे विद्यार्थ्यांनाच फेलोशिप दिली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते. या फेलोशिपसाठीच राज्यभरातील विविध केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, परीक्षेत गोंधळ झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी ही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे.
दुसरीकडे, आजचा सारथी महाज्योती आणि बार्टीच्या फेलोशिपसाठी जो पेपर घेण्यात आला तो पेपर फुटल्याचा आरोपही काही विद्यार्थ्यांनी केलाय पेपर हा फुटलेल्या इन्व्हलपमध्ये आला होता. तसेच त्याच्यावर विद्यार्थ्यांच्या सह्या सुद्धा घेतल्या नाही. त्यामुळे हा पेपर आधीच फोडला होता असाही आरोप काही विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांनी आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.


