राज्यात ७५ ठिकाणी नाट्यगृह उभारण्यासाठी निधी देणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार
कलेच्या क्षेत्रातील संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून जे कलावंत प्रयत्न करत आहेत त्यांना प्रोत्साहन आणि संधी उपलब्ध व्हावी म्हणून तालुकास्तरावर ७५ ठिकाणी नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ३८६ कोटी रुपये निधी देण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे सांगितले.
मंत्री मुनगंटीवार म्हणाले, शासन प्रयोगात्मक कलेचे जतन व संवर्धन करणाऱ्या संस्थांच्या पाठीशी आहे. नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून जे कलावंत प्रयत्न करत आहेत त्यांना मदतीचा हात शासनाकडून दिला जात आहे. आज विज्ञान युगात माहिती तंत्रज्ञानाचा प्रभाव आहे पण सुख समृद्धीचा अभाव दिसत आहे, समाधान लोप पावत आहे. कलावंतांनी राज्याचा सांस्कृतिक जपत आपले काम सुरू ठेवावे.
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याचे काम कलेच्या क्षेत्रातील या संस्था करतात आपले कौतुक करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव जपण्याचे काम शासनासोबत आपणही करत आहात. असे प्रधान सचिव विकास खारगे म्हणाले.
