राज्यातील शिक्षकांना नोकरी टिकवण्यासाठी द्यावी लागणार परीक्षा,शिक्षणमंत्र्यांचे निर्देश
शिक्षक पात्रता परीक्षा, शिक्षक भरती असे अनेक अडथळे पार करून नियुक्त झालेल्या शिक्षण सेवकांना आता कायमस्वरूपी शिक्षक बनण्यासाठी आणखी एका परीक्षेचा अडथळा पार करावा लागणार आहे. ही परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास तीन वर्षे शिक्षण सेवक म्हणून काम करणाऱ्या उमेदवारांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे.
राज्यात भरतीसाठी राबवल्या जाणाऱ्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नुकतीच शिक्षक भरती पार पडली. यात १४ हजार उमेदवारांना शिक्षण सेवक म्हणून तीन वर्षांची नेमणूक देण्यात आली. याआधीच्या नियमाप्रमाणे या शिक्षण सेवकांचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला की, ते कायमस्वरूपी शिक्षक म्हणून नियुक्त होत होते. आता ही थेट कायमस्वरूपी नियुक्ती संकटात सापडली असून त्याऐवजी राज्य परीक्षा परिषदेद्वारे या शिक्षण सेवकांची परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरच या शिक्षण सेवकांना कायम करण्यात येईल.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबतचे निर्देश दिले असले, तरी सध्या शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ही प्राथमिक चर्चा झाली आहे. त्यावर नियमावली तयार करून अध्यादेश प्रसिद्ध केला जाईल. त्यानंतरच या निर्णयाची अंमलबजावणी होईल, असे परीक्षा परिषदेच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

