राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक जाहीर, महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश…
राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. राज्यसभेच्या ५६ जागांसाठीच्या निवडणुकीचे वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. येत्या २७ फेब्रुवारी रोजी राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे. तर २९ फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
राज्यसभेत एकूण १५ राज्यांतील ५६ सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल २०२४ मध्ये संपत आहे. आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल कार्यकाळ २ एप्रिल २०२४ ला संपत आहे. तर ओडिशा आणि राजस्थानमधील खासदारांचा कार्यकाळ ३ एप्रिल २०२४ ला संपणार आहे.
राज्यसभेतील महाराष्ट्रातल्या एकूण ६ सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल २०२४ ला संपत आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे, काँग्रेसचे खासदार कुमार केतकर, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, भाजपचे खासदार श्री. व्ही. मुरलीधरन आणि राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांचा समावेश आहे.
त्यामुळे आता राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या या खासदारांना पुन्हा राज्यसभेवर जाण्याची संधी मिळणार का? सध्या मोदी सरकारमध्ये सूक्ष्म लघुउद्योग खात्याची धुरा सांभाळणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची राज्यसभेवर पुन्हा वर्णी लागणार की, पक्षाकडून लोकसभेचे तिकीट त्यांना मिळणार हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या अभूतपूर्व फुटीनंतर आमदार कोणाला मतदान करणार हे देखिल पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या एकूण खासदारांपैकी सर्वाधिक म्हणजेच, तब्बल ६० खासदार भाजपचेच आहेत. यापैकी ५७ खासदारांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये पूर्ण होत आहे. एप्रिलमध्ये निवृत्त होणाऱ्या भाजपच्या राज्यसभा खासदारांमध्ये केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, शिक्षण मंत्री भूपेंद्र यादव, आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्या नावांचा समावेश आहे. तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे देखिल निवृत्त होणार आहेत.
