अपडेटनोकरी/उद्योगमहाराष्ट्रराजकारण

महाराष्ट्रात येणारा 18 हजार कोटींचा सोलर पॅनल प्रकल्प गुजरातकडे

Share this post

राज्यात शिंदे-फडणवीस यांच्या महायुतीचे सरकार आल्यापासून महाराष्ट्रातील अनेक मोठमोठे प्रकल्प गुजरातला गेलेत. यावरून विरोधक नेहमीच सत्ताधार्यांना घेरण्याचा प्रयत्न करत असतात. वेदांता फॉक्सकॉन, टाटा-एअरबस विमान प्रकल्प आधीच गुजरातला गेल्यानंतर आता विदर्भात उभारण्यात येणारा सोलर पॅनल प्रकल्प गुजरातला गेल्याची माहिती समोर येत आहे.

काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत ट्विट करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. राजकीय आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचे वडेट्टीवार यांनी म्हंटल आहे.

विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत म्हंटल, महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे राज्यातील आणखी एक उद्योग गुजरातकडे! महाराष्ट्रात येणारा आणखी एक प्रकल्प गुजरातला गेला आहे. नागपूरमध्ये सोलर पॅनल प्रकल्प येणार होता. या प्रकल्पा अंतर्गत 18 हजार कोटींची गुंतवणूक होणार होती. राजकीय आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची माहिती पुढे आली आहे. वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प, टाटा-एअरबस विमान प्रकल्प आणि आता सोलर पॅनल प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे.

हिंदू – मुस्लिम, जीभ कापा- जीभेला चटके द्या, पक्ष फोडा- आमदार पळवा… सतत असे निरर्थक उद्योग करणारे महायुती सरकार महाराष्ट्रात असल्यामुळे जगभरातील कॉर्पोरेट कंपन्या आणि उद्योगांना राज्यात उद्योग करणे कठीण झाले आहे. अधिकारी मंत्र्यांना खुश करण्यात व्यस्त आहे. मंत्र्यांची मस्ती, आमदारांचे नको ते लाड यामुळे महाराष्ट्राची पिछेहाट होत आहे आणि राज्यातील तरुणांचे रोजगार हिरावले जात आहेत.

मागील २ वर्षात महाराष्ट्रातून वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेले. त्यानंतर हिरे उद्योगही गुजरातला गेला. एवढच नव्हे तर बॉलीवूडमधला सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा फिल्मफेअर सोहळा गुजरातमध्ये पार पडला होता. त्यामुळे मोदी शाह हि जोडगोळी महाराष्ट्रावर अन्याय करत असल्याची भावना विरोधक व्यक्त करत असतात. आता आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने विरोधक आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकार साठी मात्र हा मोठा धक्का असेल.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *