मराठा आरक्षण सर्वेक्षणासाठी गेलेल्या शिक्षकाला मारहाण,यवतमाळातील घटना…
सध्या शिक्षकांवर मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षण कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. तहसीलदारांच्या आदेशाने सर्वेक्षणाचे काम करणार्या एका शिक्षकाला अश्लील शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. ही घटना आज सोमवारी दुपारी स्थानिक जिजाऊ नगर परिसरात घडली. लोकनायक बापूजी अणे विद्यालयात कार्यरत असलेले शिक्षक संदीप पत्रे व अमोल बाबरे हे तहसील कार्यालयातील प्रशिक्षण आटोपल्यावर जिजाऊ नगरातील पतंगे ले-आउट वार्ड क्रमांक पाचमध्ये सर्वेक्षणासाठी गेले.
आशीष सावरकर (३०) याच्याकडे हे शिक्षक गेले. तुम्ही कशासाठी आले, अशी विचारणा तरुणाने केली. मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणासाठी आल्याचे सांगताच तरुणाने शिवीगाळ करणे सुरू केले. शिक्षक माघारी फिरत असताना तरुणाने संदीप पत्रे यांना मारहाण सुरू केली. दोन्ही शिक्षकांना बघून घेण्याची धमकी देत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला.
या घटनेने घाबरलेल्या शिक्षकांनी थेट तहसील कार्यालयात धडक दिली. त्यानंतर तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले.मारहाणप्रकरणी संदीप रामचंद्र पत्रे यांनी यवतमाळ शहर पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता. घटनेची माहिती पसरताच अन्य शिक्षक पोलीस ठाण्यात आले. सर्वेक्षण करणार्या शिक्षकांच्या जिवाला धोका निर्माण झाला. त्यामुळे संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली.
