भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या सुविधेसाठी मुंबई महानगरपालिकेची जय्यत तयारी…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत चैत्यभूमीवर अनुयायांचा ओघ सुरु आहे. त्यांना सुविधा देण्याकरता प्रशासनानं सर्वतोपरी तयारी केली आहे.
यंदा महिला आणि नवजात बालकांसाठी चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क इथं चैत्यभूमी हिरकणी कक्ष उभारला आहे. चैत्यभूमी इथला कार्यक्रम मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपित केला जाणार आहे.
राज्यशासनानं मुंबई शहर, आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी उद्या स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाच्या वतीनं डॉ. आंबेडकर फाऊंडेशनकडून उद्या संसद भवनाच्या प्रांगणात बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ कार्यक्रम आयोजित केला आहे.
कार्यक्रमाचा प्रारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री, खासदार आणि इतर अनेक मान्यवरांकडून पुष्पांजली अर्पण करून होईल. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या गीत आणि नाट्य विभागाकडून बाबासाहेबांना समर्पित असलेली गीतंही सादर केली जातील.
