भविष्य निर्वाह निधी आयुक्त, अंमलबजावणी अधिकारी यांना दोन लाखाची लाच घेतांना अटक…
सीबीआय अर्थात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त, अंमलबजावणी अधिकारी तसेच आणखी एका व्यक्तीला दोन लाख रुपयांच्या लाचखोरी प्रकरणात अटक केली आहे.
नाशिकमध्ये सीबीआयने प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त आणि अन्य दोन जणांना दोन लाखाच्या लाच प्रकरणात अटक केली आहे. भविष्य निर्वाह निधी आयुक्त, अंमलबजावणी अधिकारी आणि एका खासगी व्यक्तीला दोन लाखाची लाच घेताना कारवाई केली आहे. नाशिक (महाराष्ट्र) येथील रहिवासी असलेल्या EPFO अधिकारी आणि एका खासगी व्यक्तीविरुद्ध तक्रारीवरून तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला.
गणेश आरोटे असे लाचखोर प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्ताचे नाव आहे. तर, अंमलबजावणी अधिकारी अजय आहुजा आणि खासगी पीएफ एजंट बी. एस. मंगलीकर अशी अन्य दोघा संशयितांची नावे आहेत.
ईपीएफओ अधिकार्याने खाजगी पीएफसल्लागारासोबत अवाजवी रक्कम मागण्याचा आणि स्वीकारण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. तक्रारदाराच्या फर्मशी संबंधित पीएफ प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी दोन लाख ईपीएफओ अधिकाऱ्याने तक्रारदाराला खाजगी पीएफ सल्लागाराला लाच देण्याचे निर्देश दिल्याचा आरोपही करण्यात आला.
सीबीआयने सापळा रचून खासगी व्यक्ती आणि ईपीएफओच्या दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. नाशिक येथे सात ठिकाणी झडती घेण्यात आली आहे. या कारवाईत रोख रक्कम, डायरीसह इतर साहित्य जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींना नाशिक येथील सक्षम न्यायालयात हजर केले असता त्यांना १ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
