बोर्डाच्या परीक्षा वर्षातून होणार दोनवेळा, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती…
नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात झपाट्याने बदल केले जात आहेत. मागील वर्षी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनवेळा घेतल्या जातील, अशी घोषणा केली होती. त्या संदर्भातील आता महत्वाची अपडेट समोर आली आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच 2025-26 पासून बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील. परीक्षेला दोनदा उपस्थित राहिल्यास केवळ त्यांचे सर्वोत्तम गुण अंतिम मानले जातील, अशी माहिती धर्मेंद्र प्रधान यांनी एका कार्यक्रमात सांगितली.
धर्मेंद्र प्रधान म्हणाले, “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे एक उद्दिष्ट विद्यार्थ्यांवरील ताण कमी करणे हे आहे. या अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून, इयत्ता 10 वी आणि 12वीच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील. यामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारेल आणि विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास करण्याची मानसिकता तयार होईल. शिवाय नापास झाल्यानंतर खचून न जाता परीक्षा देण्याची दुसरी संधी उपलब्ध होईल.”
“वर्षातून दोनदा बोर्डाच्या परीक्षा घेण्याचा उद्देश मुलांवरील परीक्षेचा ताण कमी करणे हा आहे. जर त्यांना परीक्षेच्या वेळी तयारी वाटत नसेल तर ते परीक्षा वगळू शकतात. यासोबतच एकदा पेपर चांगले आले नाहीत किंवा आपण अधिक चांगले करू शकतो, असे वाटल्यास पुन्हा मिळालेल्या संधीचा फायदा घेऊ शकतो,” असेही ते म्हणाले.