बुलढाण्यात महाप्रसादातून ५०० हून अधिक जणांना विषबाधा…
बुलढाण्यातील लोणार तालुक्यामध्ये सोमठाणा गावामध्ये काल(मंगळवारी) एकादशी निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर महाप्रसाद ठेवण्यात आला होता. त्यामधून जवळजवळ ५०० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
कार्यक्रमानंतर महाप्रसाद म्हणून भगर आणि आमटी सर्व भाविकांना देण्यात आली होती. मात्र, भगर आणि आमटी खाल्ल्यानंतर अनेकांना उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. अंदाजे 450 ते 500 जणांना या जेवणातून विषबाधा झाली असून, त्यांच्यावर बिबी, लोणार, मेहकर, सिंदखेड राजा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अचानक इतक्या जणांना हा त्रास सुरू झाल्याने परिसरात खळबळ उडाली.
विषबाधा झालेल्यांपैकी 100 ते 120 जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर अद्याप 400 जणांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये काही वृद्ध नागरिकांचाही समावेश असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. रात्री विषबाधेच्या प्रकारानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स गैरहजर असल्याने गावकऱ्यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या ग्रामीण रूग्णालयात बेड उपलब्ध नसल्यामुळे रूग्णांना जमिनीवर झोपवून उपचार देण्यात आले. पोलीस आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी जीवितहानी होऊ नये, यासाठी प्रयत्न करत आहेत.
