प्रवेशपत्र न देणाऱ्या शाळांवर होणार कारवाई…
शुल्क भरले नाही किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) देण्यास टाळाटाळ करू नये, अशी सूचना राज्य मंडळाने यापूर्वी दिली आहे. मात्र तरीही विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र न दिल्याच्या दोन तक्रारी राज्य मंडळाकडे आल्या आहेत. संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाई केली जाईल, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.
विद्यार्थी कोणत्याही परिस्थितीत परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता राज्य मंडळ निश्चितपणे घेत असते. आतापर्यंत राज्य मंडळाकडे शाळेचे शुल्क न भरल्यामुळे प्रवेशपत्र न दिल्याच्या दोन तक्रारी आल्या आहेत. दरवर्षी अशा पद्धतीने एक-दोन तक्रारी येत असतात. पुणे, मुंबईसारख्या मेट्रो शहरांमधून प्रामुख्याने अशा तक्रारी येतात. या शहरांमधील इंग्रजी माध्यमांच्या शाळांबद्दल तक्रारी असतात. त्यामुळे अशा शाळांमधील विद्यार्थ्यांना राज्य मंडळाकडून प्रवेशपत्र काढून दिले जाते आणि ते अधिकाऱ्यांमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविले जाते.
शाळेचे शुल्क न दिल्याने अथवा अन्य कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेचे प्रवेशपत्र दिले नसेल, तर ते अत्यंत गंभीर आहे.