अपडेटचंद्रपूरशैक्षणिक

प्रधानमंत्री पोषण शक्ती अंतर्गत विद्यार्थांना वाटप केलेल्या चॉकलेटमध्ये जिवंत अळ्या व सोंडे

Share this post

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील मार्डा या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालयात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना वितरित केलेल्या चॉकलेटमध्ये जिवंत अळ्या आणि सोंडे आढळले आहे.

विद्यार्थ्यांच्या जीवीताशी खेळणा-या या पुरवठाधारकावर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी गावक-यांनी केली आहे. दरम्यान राजुरा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी मनोज गौरकार यांनी यासंदर्भात अहवाल शिक्षण विभागाकडे सादर केल्याची माहिती मिळाली असून राजुरा, कोरपना व जीवती तालुक्यात या चाॅकलेटचे वितरण बंद करण्यात आले आहे.

राजुरा तालुक्यातील मार्डा या गावात इयत्ता १ ते ७ पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून २८ ऑगस्ट रोजी चॉकलेटचे वाटप करण्यात आले होते. इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यांनी हे चांकलेट फोडून पाहिले असता त्यात जिवंत अळ्या व सोंडे आढळले. विद्यार्थ्यांनी ही माहिती शिक्षकांना दिली. यासंदर्भात मुख्याध्यापक अशोक राऊत यांनी राजुरा पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी मनोज गौरकर यांना माहिती दिली.

त्यांनी तातडीने याची दखल घेत मार्डा आणि आर्वी येथील चॉकलेट सिल करून तपासणीसाठी पाठविले असून यासंदर्भात अहवाल चंद्रपूर जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी यांना पाठविला आहे. या घटनेनंतर तातडीने राजुरा तालुक्यातील चॉकलेट वाटप बंद करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या जीवनासोबत असा खेळ करणा-या प्रकरणाची चौकशी करून संबधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. हे पोषण आहार आहे की विद्यार्थ्यांना आजारी करण्याचा आहार, अशी संतप्त प्रतिक्रिया या पालकांनी व्यक्त केली आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *