पोषण आहारातून शाळेतील ३८ विद्यार्थ्यांना विषबाधा
कळव्यातील मनिषा नगर येथील सहकार विद्या प्रसारक मंडळातील पाचवी आणि सहावी मधील तब्बल 38 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर तेथे उपचार सुरु आहेत. या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मनिषा नगर दत्तवाडी येते सहकार विद्या प्रसारक मंडळाची ही शाळा आहे. राज्य शासनाकडून दिला जाणार पोषण आहार या शाळेतही दिला जातो. आज मंगळवारी या शाळेत हा पोषण आहार दिला गेला त्यामध्ये भात, डाळ आणि मटकीची उसळ आदीचा समावेश होता. हा आहार देत असतानाच काही विद्यार्थ्यांना अन्नाच्या वासानेच मळमळल्यासारखे झाले. तर काहींनी अन्न खाल्यानंतर उलटी, पोटदुखीचा त्रास सुरु झाला. या विद्यार्थ्यांना तत्काळ महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी मुलांना तपासले असता त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे उघडकीस आले.38 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा अंदाज रुग्णालय प्रशासनाने वर्तवला. शाळा प्रशासनानेही विद्यार्थ्यांच्या पालकांना याबद्दल माहिती दिली त्यामुळे पालकांनी रुग्णालयात धाव घेतली. आजच्या पोषण आहारातील मटकीच्या उसळीमधील मटकी ही दोन ते तीन दिवस भिजत ठेवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्या उसळीचा त्रास विद्यार्थ्यांना झाला असावा असा अंदाज रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान यापूर्वीही देण्यात आलेल्या अन्नामध्ये देखील झुरळ, किडे आढळले असल्याचे पालकांनी सांगितले. या सर्व प्रकारामुळे पालक संतप्त झाले आहेत.