अपडेटउत्तर महाराष्ट्रशैक्षणिक

पूर्वप्राथमिक शिक्षणात आता खान्देशी भाषेचा समावेश…

Share this post

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (National Education Policy 2020) नुसार शिक्षण क्षेत्रात नव्याने अनेक बदल करण्यात येत आहेत. एनईपीअंतर्गत स्थानिक भाषा आणि मातृभाषेतून प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार एनसीईआरटीने (NCERT) देशभरातील ५४ स्थानिक भाषांत पूर्वप्राथमिक ते दुसरीपर्यंतचा अभ्यासक्रम तयार करून प्रसिद्ध केला आहे. या भाषांमध्ये मराठी भाषेसह खान्देशी भाषेचाही समावेश असून, या खान्देशी भाषेतील अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना खान्देशी भाषेतील अक्षरे, शब्द आणि अंकांचे उच्चार, लेखन शिकता येणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २०२२ मध्ये तीन ते आठ या वयोगटांतील मुलांना त्यांच्या मातृभाषा, घरात बोलली जाणारी भाषा, प्रादेशिक भाषेत शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आदिवासीबहुल भागातील मुलांना वर्गशिक्षण पद्धती समजू शकत नसल्याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर होतो. त्यामुळे केंद्र सरकारने ३ ते ५ या वयोगटांतील मुलांना, पहिली ते दुसरीच्या मुलांना प्राथमिक स्तरावर मुलभूत साक्षरता देण्याची व्यवस्था केली आहे.

पुस्तकातील कथा, चित्रे, संवाद याद्वारे हे शिक्षण दिले जाणार आहे. मुलांच्या सोयीसाठी खान्देशी भाषेतील गाणी, शब्द, अक्षरे देण्यात आली आहेत. त्यामुळे मुलांना त्यांच्या मातृभाषेतून मराठी ध्वनि आणि लिपी शिकता, वाचता, बोलता येईल. मातृभाषेतील उपलब्ध अक्षरे आणि मातृभाषेत नसलेली मराठी अक्षरे एकत्र करून खान्देशी भाषा शिक्षण प्रवेशिका हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. या पुस्तकाद्वारे ध्वनिची ओळख तसेच वर्णमालेची ओळख होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पुढील काळात विद्यार्थ्यांचे भाषेमुळे काही प्रमाणात होणारे नुकसान कमी होईल.

खान्देशी भाषा शिक्षण प्रवेशिका या पुस्तकानुसार खान्देशी भाषेतील अक्षरे, शब्द, अंक देण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, अ अऊत (नांगर), आ आकटी (शेकोटी), इ इज (वीज), ई इस्तो (विस्तव), ऐ ऐना (आरसा) अशा पद्धतीने अक्षरे शिकवली जातील. तर यक (एक), सऊ (सहा), दा (दहा), आकरा (अकरा), सोया (सोळा) अशा पद्धतीने अंक शिकवले जाणार आहेत. तसेच कविता, चित्रेही देण्यात आली आहेत.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *