पुणे जिल्हा परिषदेने केल्या 13 शाळा बंद
पुणे जिल्हा परिषदेने 49 अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर 13 अनधिकृत शाळा बंद केल्या आहेत. त्यातील दहा शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल केले असून इतर शाळांवर गुन्हे दाखल करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे, असे पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितले.
राज्य शासनाची परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरू असलेल्या शाळांवर गेल्या वर्षापासून शिक्षण विभागाकडून कारवाई केली जात आहे. त्याचाच भाग म्हणून या शैक्षणिक वर्षात पुणे जिल्हा परिषदेने 49 अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यातील काही शाळा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात, तर काही शाळा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आणि काही शाळा पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील आहेत. त्यात अनेक नामांकित शाळांचा समावेश होता.त्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. शाळांवर आता प्रत्यक्षात कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. काही संस्थांनी स्वतःहून शाळा बंद केल्या आहेत. तर शिक्षण विभागाला अनधिकृतपणे शाळा सुरू ठेवणाऱ्या संस्थाचालकांवर कारवाई करण्याची वेळ आली आहे.
शिक्षण विभागातर्फे जीजस क्राईस्ट इंग्लिश मीडियम स्कूल खामशेत ता. मावळ, किंग वेळ पब्लिक स्कूल रायवूड, लोणावळा, इ एम एच इंग्लिश मीडियम स्कूल ,फुरसुंगी, रामदास सिटी स्कूल, रामदरा लोणी काळभोर, ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल, उंड्री ता. हवेली, लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल चिंचवडे नगर ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल लिंक रोड चिंचवड, आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल पिंपळे गुरव, पीपल ट्री एज्युकेशन ट्रस्ट गांधीनगर पिंपळे निलख,तक्वा एज्युकेशन ट्रस्ट संचालित तक्वा इस्लामिक स्कूल अँड मक्तब, कोंढवा बुद्रुक, या शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अनधिकृत 49 शाळांपैकी 5 शाळांना मान्यता मिळालेले असून तीन शाळांना शासनाकडून पत्र प्राप्त झालेले आहे. तर चार अनधिकृत शाळांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.तसेच दोन शाळांनी दंड भरला आहे.उर्वरित 12 शाळांवर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात क्षेत्रीय स्तरावर कारवाई सुरू आहे,असेही संजय नाईकडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.