पार्ट टाईमच्या जॉबच्या नावावर फसवणूक करणाऱ्यांना 100 हून अधिक वेबसाईट केंद्र सरकारकडून बंद…
कोरोना काळात अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम फोमची सुविधा सुरु केली होती. कोरोनानंतरही आजच्या घडीला देखील ही वर्क फ्रॉम होमची व पार्ट टाईम काम ऑनलाईन सुविधा कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने सुरु ठेवण्यात आली आहे.
पार्ट टाईम जॉब आणि ऑनलाईन जॉब सर्च करण्याचा ट्रेंड फसवणूक करणाऱ्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी काही लोकांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करण्याची सुरुवात केली. गेल्या काळात अशा पद्धतीच्या सायबर क्राईमच्या बातम्या देशभरातून येत होत्या. अशा बनावट कंपन्यांनी कामाच्या बदल्यात चांगल्या पैशांचे आमिष दाखवून लोकांना फसवल्याचा प्रकार समोर आला. अनेकांची बँक खाती रिकामी झाली आहेत.अशातच आता सरकारने या बनावट वेबसाइट्सवर कडक कारवाई केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने फसवणूक करणाऱ्या अशा 100 हून अधिक वेबसाइट्सवर बंदी घातली आहे. त्यामुळे या घोटाळेबाजांच्या कामाला आता चाप बसण्यास मदत होणार आहे.
या वेबसाइट्स भारत नाही तर भारताबाहेरून चालवल्या जात होत्या. इतकंच नाही तर या लोकांमार्फत अवैध गुंतवणूकही केली जात होती. ते चॅट मेसेंजर आणि डिजिटल जाहिरातींच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करत असत.नॅशनल सायबर क्राइम थ्रेट अॅनालिसिस युनिट (NCTAU) च्या इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) ने गेल्या आठवड्यात या वेबसाइट्सची माहिती काढली होती. यानंतर केंद्र सरकारने त्यांना बंद करण्याची शिफारस पाठवली होती. या वेबसाइट्स युझर्सना चुकीच्या पद्धतीने नोकरी आणि गुंतवणूकीची ऑफर देऊन फसवत होत्या. माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या वेबसाइट्स ब्लॉक केल्या आहेत.
