नाशिक आश्रमशाळेतील धक्कादायक बाब,शिक्षक आणि 2 महिला शिक्षकांवर निलंबनाची कारवाई…
नाशिक जिल्ह्यातील एक आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
एका एकलव्य निवासी आश्रमशाळेतील सातव्या इयत्तेतशिकणाऱ्या 15 ते 20 विद्यार्थिनींशी तेथील शिक्षकाने अश्लील वर्तन केल्याची माहिती समोर आली आहे.निवासी शाळेतील शिक्षक विद्यार्थिनींना शिकवण्याच्या बहाण्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. त्याच्याकडून अनेकदा असे प्रकार घडले. सुरुवातीला या मुलींनी याकडे विशेष लक्ष दिलं नाही. मात्र काही मुलींनी धाडस दाखवत पालकांकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.
या प्रकरणात कळवण प्रकल्प कार्यालयाच्या विशाखा समितीने सखोल चौकशी केली.
पीडित मुलींनी नोंदवलेल्या जबाबानुसार संबंधित शिक्षकाने वारंवार अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याचं निष्पन्न झालं आहे. या प्रकरणाचा अहवाल विशाखा समितीने प्रकल्प कार्यालयाला सादर केला होता.
याबद्दल अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी आदिवासी आयुक्तालयास जाब विचारला. आदिवासी विकास उपायुक्त विनीता सोनावणे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित शिक्षक आणि 2 महिला शिक्षकांवर तत्काळ निलंबनाची कारवाई केली.
या प्रकरणासंदर्भात बोलताना विनीता सोनवणे यांनी प्राथमिक माहितीनुसार संबंधित शिक्षक दोषी असल्याने त्याला निलंबित करण्यात आल्याचं सांगितलं. “विशाखा समितीच्या अहवालानुसार संबंधित शिक्षक प्रथमदर्शनी दोषी असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये 2 महिला शिक्षकांची नियुक्तीसुद्धा रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये संबंधित शिक्षकाची विभागीय चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती उपायुक्त विनीता सोनावणे यांनी दिली.
