नागपुरातील भीषण स्फोटात 9 कामगारांचा मृत्यू …
नागपूरच्या बाजारगावातील सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 6 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे.
सकाळी 9 च्या सुमारास कंपनीत स्फोट झाला, मात्र या स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, ही कंपनी संरक्षण क्षेत्रासाठी शस्त्रास्त्रांचे स्फोटकं बनवण्याचं काम करते.
दरम्यान नागपुरातील स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दुर्घटनास्थळाची पाहणी केली. या स्फोटामागच्या कारणांचा शोध घेणार असल्याचं त्यांनी सांगितल.
सोलार इंडस्ट्रीजमध्ये स्फोट झाल्यानंतर वेगवेगळ्या युनिटमधील सर्व कर्मचारी बाहेर पडले. सकाळी ९ ते साडे नऊ वाजतादरम्यान ही घटना घडली असून अद्याप कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेले नाहीत. तसेच त्या युनिटमधील बचावलेल्या मात्र गंभीर जखमी असलेल्या कामगारांनादेखील दुपारी दीड वाजेपर्यंत उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले नव्हते.
या घटनेनंतर कामगारांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. जोपर्यंत मृत कामगारांचे मृतदेह मिळत नाही तोपर्यंत कंपनीच्या प्रवेशद्वाराहून हटणार नसल्याची भूमिका कामगारांकडून घेण्यात आली होती. स्थानिक पोलिसांनी परिस्थिती चिघळू नये म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला पाचारण करण्यात आले होते.
