देशातली मुलींची पहिली शाळा (भिडेवाडा) – राष्ट्रीय स्मारकासाठी इतिहासजमा…
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात देशातली मुलींची पहिली शाळा सुरू केलेला भिडेवाडा रात्री पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आला. आता त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक होणार आहे.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी बुधवार पेठ परिसरातील भिडे वाड्यात मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू केली. या वाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी मागणी ‘मुलींची पहिली शाळा सार्वजनिक स्मारक समिती’च्या वतीने पुढे आली होती. त्याला पुणे महापालिका आणि राज्य सरकारनेही अनुकूलता दर्शवली. मात्र, १३ वर्षे हे प्रकरण न्यायालयात अडकले होते. या वाड्यासंदर्भातील स्थानिक रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली होती.
भिडे वाडा महापालिका प्रशासनाने सोमवारी रात्री ताब्यात घेतला. सर्वोच्च न्यायालयाने दोन नोव्हेंबरला भिडे वाड्याची जागा महिनाभरात पालिकेच्या ताब्यात देण्याचा आदेश याचिकाकर्त्यांना दिला होता. त्यानुसार, प्रशासनाने भिडे वाड्यातील व्यावसायिकांना सकाळी नोटिसा बजावल्या आणि रात्री उशिरा बांधकामे पाडून जागा ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली. अशा प्रकारे भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी गेल्या तेरा वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्याला पूर्णविराम मिळाला.
