दहावी व बारावीची परीक्षा देणाऱ्या ‘पासधारक’ विद्यार्थ्यांसाठी पीएमपी प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय…
दहावी व बारावीची परीक्षा देणाऱ्या ‘पासधारक’ विद्यार्थ्यांसाठी पीएमपी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी पासधारकांना त्यांच्या पासवर परीक्षा केंद्रावर जाता येणार आहे. त्यांच्या मार्गात बदल झाला तरी त्यांना बस प्रवासासाठी तिकीट काढावे लागणार नाही. यामुळे सुमारे ३० हजार पासधारक विद्यार्थ्यांना थेट फायदा होणार आहे.
पीएमपी प्रशासन विद्यार्थ्यांना घर ते महाविद्यालय प्रवासासाठी पास देते. तो पास त्या मार्गावरून धावणाऱ्या बस गाडीतच ग्राह्य धरला जातो. अन्य मार्गावर पास ग्राह्य धरला जात नाही. मात्र, परीक्षा केंद्रे वेगवेगळ्या मार्गांवर असल्याने पीएमपी प्रशासनाने विद्यार्थी पासधारकांसाठी घर ते परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी दिलेला पास ग्राह्य धरणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तिकीट काढावे लागणार नाही. यामुळे विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. २१ फेब्रुवारी ते १९ मार्चदरम्यान बारावीच्या विद्यार्थ्यांची, तर १ ते २६ मार्चदरम्यान दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे.
विद्यार्थ्यांना सोयीचे ठरणार :- परीक्षेच्या काळात पासधारक विद्यार्थ्यांना घर ते परीक्षा केंद्रदरम्यान पास वैध मानण्यात येईल.- परीक्षार्थी विद्यार्थ्यांना बसमध्ये पुढील दरवाजातून प्रवेशाची मुभा राहील.- परीक्षार्थी विद्यार्थ्यांना प्राधान्याने बससेवा उपलब्ध व्हावी, याकरिता गर्दीच्या बसथांब्यावर अधिकारी किंवा पर्यवेक्षकीय सेवकांची नियुक्ती केली असेल.- शालेय व्यवस्थापनाकडून सूचना आल्यास अतिरिक्त बसचेदेखील नियोजन करण्यात येईल.
