डीपफेकला बसणार आळा, MCA आणि मेटा मिळून सुरू करणार हेल्पलाईन…
सध्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे डीपफेकचं प्रमाण वाढलं आहे. निवडणूक काळात याच्या मदतीने फेक न्यूज आणि चुकीची माहिती पसरण्याचा धोका आहे. यामुळे काही दिवसांपूर्वीच दिग्गज टेक कंपन्यांनी एकत्र येत एक करार केला होता. यानंतर आता MCA आणि मेटा मिळून व्हॉट्सअॅपवर एक फॅक्ट-चेक हेल्पलाईन सुरू करणार असल्याचं घोषित केलंय.
मिसइन्फर्मेशन कॉम्बॅट अलायन्स (MCA) ही एक क्रॉस-इंडस्ट्री संघटना आहे जी विविध कंपन्या, संस्था आणि उद्योग संघांना चुकीच्या माहितीविरोधात लढण्यासाठी एकत्र आणते. आता एमसीएने मेटासोबत मिळून डीपफेक विरोधात ही नवीन मोहीम राबवली आहे. ही हेल्पलाईन मार्च 2024 पासून सुरू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
व्हॉट्सअॅपवर आलेल्या एखाद्या मेसेजमधील माहिती खरी आहे की खोटी हे तुम्ही या माध्यमातून तपासू शकणार आहात. यासाठी केवळ तुम्हाला तो मेसेज व्हॉट्सअॅप चॅटबॉटल पाठवावा लागणार आहे. व्हॉट्सअॅपचा एआय चॅटबॉट हा इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांना सपोर्ट करतो.
व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर आलेल्या सर्व संदेशांना तपासण्यासाठी MCA एक केंद्रीय डीपफेक विश्लेषण युनिट स्थापन करणार आहे. मेसेजमधील कंटेंट तपासून, त्यातील सत्यता पडताळून तो मेसेज खरा आहे की फेक हे ठरवण्यात येईल. यासाठी एमसीए विविध इंडस्ट्री पार्टनर्स आणि डिजिटल प्रयोगशाळांची मदत घेणार आहे.
