डिसेंबरमध्ये होणार नवीन पोलीस भरती, कार्यालयाने मागवली रिक्त जागांची माहिती
राज्यात गेल्या दोन वर्षांत जवळपास ३५ हजार पोलीसांची भरती झाली. मात्र, आता पुन्हा डिसेंबर मध्ये जवळपास ७ हजार ५०० पदांची मोठी भरती होणार आहे. साधारण साडेसात हजार पदांसाठी भरती होणार असून त्यात मुंबई पोलीस दलासाठी १ हजार २०० पदे आहेत. राज्यात २०२२ व २०२३ मध्ये मोठ्या पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबर मध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे. त्यासाठी गृह खात्याने विविध विभागांकडून रिक्त जागांचा तपशील मागवला आहे.
करोना काळात सुमारे तीन वर्षे राज्य पोलीस दलात भरती झाली नाही. त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी तुलनेत पोलीस संख्याबळ कमी आहे. गेल्या दोन वर्षांत अनुक्रमे १८ हजार व १७ हजार पदांची मोठी पोलीस भरती राज्यात झाली. परंतु त्या तुलनेने आणखी सात ते आठ हजार पोलीस संख्याबळ मिळणे अपेक्षित असल्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा साडेसात हजार पदांसाठी भरती होण्याची शक्यता आहे.
सध्याची १४ हजार ४७१ पदांची पोलीस भरती पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्वच जिल्हा अधिकाऱ्यांना दिले होते. आतापर्यंत २५ जिल्ह्यांत पोलीस शिपाई, आठ जिल्ह्यांत चालक शिपाई व पाच जिल्ह्यांत बॅण्डसमॅनची लेखी परीक्षा घेण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये सप्टेंबरपर्यंत भरती पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात मुंबई पोलिसांना मैदाने न मिळाल्यामुळे त्यांची भरती प्रक्रिया थोडी उशीराने सुरू झाली. परंतु ती ही लवकरात लवकर संपवण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यात नवीन पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे.
राज्यातील १० पोलीस प्रशिक्षण केंद्रांची क्षमताही आता वाढविण्यात आली आहे. सध्या १० प्रशिक्षण केंद्रांमध्ये ८ हजार ४०० पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येते. येणाऱ्या काळात त्यात दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे.