टीम इंडियाचा सलग नववा विजय – नेदरलँड्सवर 160 धावांनी विजय…
वर्ल्ड कप-2023 च्या साखळी टप्प्यातील शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने नेदरलँड्सचा 160 धावांनी पराभव केला. आणि टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप 2023 मध्ये सलग 9वा विजय नोंदवला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकांत 4 गडी गमावून 410 धावा केल्या.

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून नेदरलँड्सविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या 10 षटकांमध्ये रोहित आणि शुभमन गिल यांनी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर वादळ आणले. पॉवरप्लेमध्ये टीम इंडियाने एकही विकेट न गमावता 91 धावा केल्या. दरम्यान, गिल 32 चेंडूत 51 धावा करून बाद झाला. 3 चौकार आणि 4 षटकार मारले. रोहितने 54 चेंडूत 61 धावा केल्या. 8 चौकार आणि 2 षटकार मारले.

तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विराट कोहलीने मैदानात येताच चांगले शॉट मारले. मात्र 56 चेंडूत 51 धावा करून तो बाद झाला. त्यादरम्यान त्याने 5 चौकार आणि एक षटकार मारला. तिसरी विकेट 200 धावांवर पडली. यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुलने 200 हून अधिक धावांची भागीदारी केली आणि टीम इंडियाची धावसंख्या 400 धावांच्या पुढे नेली. अय्यर 94 चेंडूत 128 धावा करून नाबाद राहिला. त्याने 10 चौकार आणि 5 षटकार मारले. तर केएल राहुल 64 चेंडूत 102 धावा करून बाद झाला. त्याने 11 चौकार आणि 4 षटकार मारले.

प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ केवळ 250 धावा करू शकला. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी 2-2 विकेट घेतल्या. विराट कोहली आणि रोहित शर्मानेही प्रत्येकी एक विकेट घेतली. वर्ल्ड कपमधील त्याची ही पहिली विकेट आहे.
