टीईटी परीक्षा ऑनलाईन नाही, ऑफलाईनच होणार…
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे यंदा प्रथमच टीईटी परीक्षा ऑनलाईन घेण्याचे नियोजन करण्यात आले होते.मात्र,माध्यम निहाय परीक्षा घेताना अडचणी येत असल्याने परिषदेने ऑफलाईन परीक्षेचा पर्याय स्वीकारला आहे.राज्य शासनाने परिषदेला ऑफलाईन परीक्षा घेण्यास मान्यता दिली असून येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात ऑफलाईन पध्दतीने टीईटी परीक्षा घेण्याचे नियोजन केले जात आहे.त्यामुळे टीईटी परीक्षेच्या प्रतीक्षा असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाईन पध्दतीने तयारी करावी लागणार आहे.
राज्यात बहुतांश सर्वच परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेतल्या जात आहेत.त्यामुळे परीक्षा परिषदेने सुध्दा टीईटी परीक्षेची तयारी ऑनलाईन पध्दतने करण्याचे ठरवले.त्याची तयारी सुध्दा केली.मात्र,इंग्रजी, मराठी,उर्दू अशा माध्यमांमध्ये परीक्षा घेणे अडचणी ठरत असल्याचे समोर आले.परिणामी परिषदेने शासनाकडे पुन्हा एकदा पत्रव्यवहार करून टीईटी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यास परवानगी मागितली.शासनाने ऑफलाईन परीक्षेला नुकतीच परवानगी दिली आहे,असे परिषदेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात सध्या शिक्षक भरातीचे वारे वाहत आहे.पुढील काही वर्षात उर्वरित पदावर भरती होण्याची शक्यता आहे.शिक्षक पदासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे.वर्षातून दोन वेळा टीईटी परीक्षा होणे अपेक्षित आहे. मात्र, काही कारणास्तव वर्षातून दोनदा परीक्षा होत नाही.त्यामुळे पुढील परीक्षा केव्हा होणार यांची अनेक उमेदवार प्रतीक्षा करत आहेत.
टीईटी परीक्षेत झालेल्या घोटाळा विचारात घेता टीईटी परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेऊन या परीक्षेचा निकाल लवकर जाहीर करणे शक्य झाले असते.ऑफलाईन परीक्षेमुळे नियोजनासह निकाल जाहीर करण्यास बराच कालावधी लागणार आहे.त्यामुळे परीक्षेची तयारी करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना अवधी मिळणार आहे.तसेच यापूर्वीच्या परीक्षांमध्ये झालेल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिषदेकडून अत्यंत काळजीपूर्वक परीक्षेचे नियोजन केले जाणार आहे.
