जिल्हाधिकाऱ्यांकडून, ११९ मुख्याध्यापकांवर फौजदारी गुन्हे दाखल
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल ११९ शाळांच्या मुख्याध्यापकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संबंधित शाळांनी कर्मचाऱ्यांची माहिती प्रशासनाला दिली नसल्याने सदरील शाळांच्या मुख्याध्यापकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात सुमारे १७ हजार कर्मचारी लागणार आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने तीन महिन्यांपूर्वी सर्व सरकारी कार्यालयांना त्यांच्याकडे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी व सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश दिले. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा, नगरपालिका, महापालिकेच्या शाळा यांच्यासह खाजगी अनुदानित शाळांकडूनही कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती मागवली होती. मात्र, जिल्ह्यातील ११९ खासगी अनुदानित शाळांकडून ही माहिती देण्यासाठी टाळाटाळ केल्याने या शाळेच्या मुख्याध्यापकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय जिल्हा निवडणूक कार्यालयाने घेतला आहे.
जिल्ह्यातील सर्वाधिक सिल्लोड तालुक्यातील ७९ शाळांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ फुलंब्री -१४, संभाजीनगर पूर्व -९, पैठण – ८, संभाजीनगर पश्चिम – ४, गंगापूर -३ आणि संभाजीनगर मध्य येथील २ शाळांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडून हा कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून या कारवाईमुळे जिल्ह्यासह राज्यभर एकच खळबळ उडाली आहे.