जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे, पोषण आहाराच्या पाकिटात सापडला मेलेला उंदीर
आहाराच्या नावाखाली मुलांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचं समोर आल आहे. जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे पोषण आहारात मेलेला उंदीर आढळला आहे. या आधीही अशा अनेक घटना राज्यात घडल्यात आहेत.
नशिराबाद अंगणवाडीतील पोषण आहारात चक्क मेलेला उंदीर सापडलाय. अंगणवाडीतील पोषण आहाराच्या मिक्स तांदळाच्या पाकिटात मेलेला उंदीर सापडलाय. तेजस्वी देवरे या गृहिणीच्या स्वयंपाकादरम्यान ही बाब लक्षात आली. लहान मुलांच्या पोषण आहारात मेलेला उंदीर सापडल्यानं प्रशासनाचा अनागोंदी कारभार पुन्हा चव्हाट्यावर आलाय.
शालेय पोषण आहारात मेलला उंदिर सापडण्याची ही काय पहिलीच वेळ नाही. कंत्राटदारांनी पोषण आहारात अनेक प्राणी सापडतील याची जणू सोयच केली की काय अशी शंका येते. साप, चिमणी, बेडूक आणि आता उंदीर आढळल्याने पालकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. याआधी पोषण आहारात किडे सापडायचे. कधी पाली, मग गेल्या वाटेला कधी झुरळं किंवा अळ्या सापडायच्या. मात्र आता थेट उंदिर सापडल्याने प्रशासनाचे डोळे कधी उघडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या प्रकरणी आता काय कारवाई होते ? ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. संबंधित प्रकरण तापलं तर या प्रकरणी चौकशी समिती स्थापन केली जाऊ शकते किंवा एखाद्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई व्हायला हवी. पण तशी कारवाई होते की नाही ? याची देखील शाश्वती नाही. विशेष म्हणजे असे संतापजनक प्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाकडून आणखी काही प्रयत्न का केले जात नाहीत ? असा प्रश्न आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातोय.