जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे 16 ते 20 जानेवारी दरम्यान पंडित प्रदीपजी मिश्रा (सिहोरवाले) यांच्या महाशिवपुरान कथेचे आयोजन…
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे 16 ते 20 जानेवारी दरम्यान पंडित प्रदीपजी मिश्रा (सिहोरवाले) यांच्या महाशिवपुरान कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे 40 एकरावरील या कथा सोहळ्याची पूर्वतयारी तसेच नियोजन व्यवस्था बद्दलची सविस्तर माहिती कथा कार्यक्रमाचे आयोजक खासदार उन्मेषदादा पाटील यांनी रविवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.
चाळीसगाव शहरालगत मालेगाव रस्त्यावर सुमारे 40 एकरावर कथास्थळ साकारले असून, वाहनांच्या पार्किंगकरीता 80 एकरात आठ वाहनतळ उभारण्यात आले आहे. प्रत्येक वाहनतळाचा विस्तार 10 एकरात असल्याने सर्व दिशांनी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांची कोंडी होण्याचा प्रकार टाळता येणार आहे. कथेची वेळ दररोज दुपारी 2 ते 5 वाजेची असेल.
चाळीसगाव येथील महाशिवपुराण कथा कार्यक्रमासाठी सुमारे सात ते आठ लाख भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहांची पुरेशी सोय करण्यात आली आहे. याशिवाय कथास्थळी रात्री साधारणतः दोन ते अडीच लाख भाविक मुक्कामी थांबण्याची शक्यता गृहीत धरून त्यांच्या जेवणाची सर्व व्यवस्था केली जाणार आहे. 400 मोबाईल टॉयलेट उपलब्ध राहणार असल्याने स्वच्छतेचा प्रश्नही निकाली निघणार आहे. सुमारे 16 हजार स्वयंसेवकांनी यापूर्वीच नोंदणी केलेली असल्याने भाविकांची कोणतीच गैरसोय कथा कार्यक्रमाच्या ठिकाणी होणार नाही याची काळजी घेणारं असे खासदार उन्मेषदादा पाटील यांनी सांगितले.
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमित्त साधून चाळीसगावात सुमारे दोन लाख दिव्यांचा वापर करून श्रीरामाची भव्य दिव्य प्रतिकृती साकारली जाणार आहे. विश्व विक्रमी अशी प्रतिकृती 20 जानेवारीपासून भाविकांना दर्शनासाठी खुली केली जाणार आहे.