चौथीच्या विद्यार्थ्यांनीचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र,पुस्तक वाचायला मजा येत नाही…
‘माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमाच्या अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना आवाहन करण्यासाठी पाठवलेल्या पत्रावर आम्ही सगळे अभ्यास सोडून तुम्हाला पत्रच लिहायचे का? असा थेट सवाल मुख्यमंत्र्यांना केला आहे. तिच्या या धाडसावर राज्यातील शिक्षक पालकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तर या पत्राचे अनेक ठिकाणी स्वागत होत असून एका मुलीने दाखवलेल्या धाडसाचे कौतुकही केले जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील जि. प. प्राथमिक शाळा, गोंडगुडा (धोंडाअर्जूनी) या शाळेत इयत्ता चौथी शिकणाऱ्या विद्यार्थिनीने पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना हा सवाल उपस्थित केला आहे.ती आपल्या पत्रात म्हणते, माननीय मुख्यमंत्री तुम्ही दिलेले पाठ्यपुस्तक मला आवडले नाही. कारण एका विषयासाठी चार-चार पुस्तके शोधावे लागतात. यापेक्षा आमचे जुने पुस्तक छान होते. कारण सगळं गणित एका पुस्तकात सगळे इंग्रजी-इंग्रजी एका पुस्तकात सगळ्या विज्ञान एका पुस्तकात होते. त्यामुळे एकाच विषयाचे पुस्तक वाचायला मजा यायची.
सगळ अभ्यास सोडून तुम्हाला पत्र लिहीत राहायचे का, तुम्ही जिंदा आहेत का, असा मार्मिक सवाल देखील या मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
राज्यातील शाळांमध्ये ‘माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रावर विद्यार्थ्यांना या संदर्भात प्रतिक्रिया देऊन पत्र लिहून घेणे, त्यासोबतच सेल्फी करून ती पाठवणे, तसेच स्वच्छता मॉनिटर आदी उपक्रम राबवले जात आहेत.त्याच पार्श्वभूमीवर विविध सर्व विद्यार्थ्यांकडून मुख्यमंत्र्याच्या पत्रासंदर्भात हे पत्र आवडले का, या विषयावर या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांकडून पत्र लिहून घेण्यात येत आहेत. त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने सगळ अभ्यास सोडून तुम्हाला पत्र लिहीत राहायचे का? असा सवाल केल्याने यावर शिक्षण तज्ज्ञांनी सरकारने यावर विचार करण्याची गरज व्यक्त केली आहे.
समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शासनाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे कमी करण्याचा निर्यण या शैक्षणिक वर्षापासून अंमलात आला. प्रत्येक तिमाहित केवळ एकत्रित पुस्तक विद्यार्थ्यांना शाळेत आणावे लागत आहे. या अभियानाला वर्षही उलटत नाही तोच आता विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.शिक्षण विभागाकडून बालभारती एकात्मिक भाग एक ते चार अशा चार भागात सर्व विषयांची एकत्रित चार पुस्तके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक तिमाहीत अनुक्रमे त्यातील एक पुस्तक विद्यार्थ्यांना शाळेत आणावे लागत आहे. मात्र, यावर आता एक चिमुकलीने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित मला हे काहीच समजत नसून मला ते आवडले नाही असे पत्रात नमुद केले आहे.
