अपडेटमहाराष्ट्रशैक्षणिक

चंद्रपूरमधील शाळा अदानींच्या ताब्यात, राज्य सरकारचा मोठा निर्णय, विरोधी पक्ष नेत्यांचे टीकास्त्र

Share this post

चंद्रपुर येथील माउंट कार्मेल कॉन्हेंट उच्च माध्यमिक शाळा शालेय शिक्षण विभागाकडून अदानी समूहाला हस्तांतरीत करण्यात आली असून अदानी समूहाकडे व्यवस्थापनासाठी दिली आहे.राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने यासंदर्भात नुकताच शासन आदेश प्रसिद्ध केला आहे. या निर्णयानंतर आता पुढील १५ दिवसात शाळेचे व्यवस्थापन बदलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. घुग्घुस येथील माउंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा अदानी फाऊंडेशनला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे अदानी समूहाने आता चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला आहे.

कार्मेल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित, असलेली माउंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा इंग्रजी माध्यमाची स्वयं-वित्तपोषित आहे. यापुर्वीच ही शाळा अदानी फाउंडेशन, अहमदाबाद येथे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन होता. या संदर्भात 30 जून 2024 रोजी शिक्षण उपसंचालक, नागपूर यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली. त्यानुसार या शाळेचे व्यवस्थापन अदानी समुहाकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शाळा अदानी फाऊंडेशनकडे हस्तांतरित करताना सरकारने काही अटीही घातल्या आहेत, ज्यांचे पालन अदानी फाऊंडेशनला करावे लागणार आहे. यामध्ये मुख्य अट म्हणजे अदानी समूह शाळेतील विद्यार्थी संख्येत कोणताही बदल करू शकत नाही. याशिवाय व्यवस्थापन बदल झालेल्या शाळेची किमान पटसंख्येची अट कोणत्याही कारणास्तव शिथिल केली जाणार नाही. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संपूर्ण जबाबदारीही अदानी समूहाची असेल. अदानी यांना येत्या १५ दिवसांत या शाळेचे व्यवस्थापन ताब्यात घ्यायचे आहे. व्यवस्थापनाबाबत किंवा भविष्यात नियमांचे उल्लंघन झाल्याची तक्रार आल्यास शाळेचे हस्तांतरण रद्द करण्याचे अधिकार राज्य सरकारकडे आहेत.

चंद्रपूर येथील माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा अदानी व्यवस्थापनाला हस्तांतरित करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्राला महायुती सरकारएवढाच अदानींचाही धोका आहे. विमानतळ, वीज, धारावी आणि आता शाळेवर अदानींचा डोळा आहे. महायुती सरकार महाराष्ट्राचा सातबारा अदानीच्या नावे लिहिणार का, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.

देशाला शिक्षणाचा मार्ग देणाऱ्या महाराष्ट्रावर आज अदानी समूहाच्या हातून बाराखडी लिहिण्याची वेळ आली आहे. जमीन, उद्याोगांबरोबरच सरकार आता शाळाही अदानींच्या ताब्यात देत आहे. महाराष्ट्र विक्रीला काढल्याचे हे उत्तम उदाहरण आहे, असे दानवे यांनी म्हटले आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *