कॉम्प्युटर टायपिंग परीक्षेत मोठा बदल,गैरकारभाराला बसणार चाप…
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या कॉम्प्युटर टायपिंग (संगणक टंकलेखन) परीक्षेत डमी उमेदवारांकडून होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा परिषदेकडून जून २०२४ मध्ये होणाऱ्या परीक्षेत मोठे बदल केले जाणार आहेत.परीक्षेदरम्यान डमी उमेदवारांकडून विद्यार्थ्यांचे स्पीड पॅसेज टायपिंग करून घेणे, परीक्षा केंद्रांवर बाजूच्या खोलीमधील संगणकाच्या माध्यमातून डमी उमेदवाराकडून उत्तरपत्रिका सोडवून घेणे, असे अनेक प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परीक्षेत बदल केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ.नंदकुमार बेडसे यांनी दिली.
संगणक टंकलेखन परीक्षेत बोगस उमेदवारांसह गैखकारांना पायबंद घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जून २०२४ मध्ये होणाऱ्या परीक्षा प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रश्नांचा क्रम बदलण्यासह ई-मेलच्या प्रश्नाच्या वेळेत कपात केली असून, त्यासाठी ८ ऐवजी ५ मिनिटे दिली जाणार आहेत. स्पीड पॅसेज वेगात सोडवण्याचा सराव होण्यासाठी ३ मिनिटांचा सराव उतारा (ट्रायल पॅसेज) देण्यात येणार आहे.
डिसेंबर २०२३ आणि त्यापूर्वी पार पडलेल्या संगणक टंकलेखन परीक्षेदरम्यान केंद्रावर डमी उमेदवार बसवणे, त्यांच्याकडून परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांचे स्पीड पॅसेज टंकलिखित करून देणे, बाजूच्या खोलीमधील संगणकाच्या माध्यमातून डमी उमेदवाराकडून उत्तरपत्रिका सोडवून घेणे, अशा गंभीर स्वरूपाचे गैरप्रकार झाल्याचे आढळून आले आहे. डमी उमेदवारांच्या माध्यमातून स्पीड पॅसेज सोडवता येऊ नये, यासाठी पूर्वीच्या प्रश्नांमधील क्रम बदलण्यात येणार आहेत, अशी माहिती डाॅ. बेडसे यांनी दिली.
