केरळ दौरा येणार अधिकाऱ्यांच्या अंगलट, शिक्षणाधिकऱ्यांनी मागवला अहवाल…
नागपूर शिक्षण विभागाच्या केरळ दौऱ्यात जिल्हा परिषदेच्या बाहेरील सदस्यांचा समावेश होता. याची दखल घेत प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनीही संबंधित दौऱ्याचा संपूर्ण अहवाल मागवला आहे. त्यामुळे हा दौरा संबंधित अधिकाऱ्यांच्या अंगलट येणार असल्याचे दिसते.
अर्थ व शिक्षण समितीच्या सदस्यांसाठी केरळाचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यासाठी पाच लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. केरळ येथील शाळांची माहिती घेऊन त्याचा जि. प. शाळांमध्ये उपयोग करण्याचा उद्देश असल्याचे सांगण्यात येते. हा दौरा फक्त अर्थ व शिक्षण समितीच्या सदस्यांसाठी असताना यात समितीमध्ये नसलेल्या सदस्यांचाही समावेश होता.
त्याच प्रमाणे जिल्हा परिषदेच्या बाहेरील सदस्यही या दौऱ्यात होते. या दौऱ्यात शिक्षण विभागातील अधिकारीही होते. दौऱ्यातील काही सदस्य व अधिकाऱ्यांनी येथील फोटो व व्हिडिओ समाजमाध्यमांवर टाकले.
ही बाब समोर येताच प्राथमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनीही संपूर्ण अहवाल मागविल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे हा दौरा अधिकाऱ्यांच्या चांगलेच अंगलट येणार असल्याचे बोलल्या जात आहे.
जिल्हा परिषदेच्या बाहेरील सदस्यांनी स्वतः खर्च केल्याची सारवासारव प्रशासनाकडून करण्यात येत आहे. परंतु हा दौरा फक्त अर्थ व शिक्षण समितीच्या सदस्यांसाठी असताना बाहेरील सदस्य गेलेच कसे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
हा एक प्रकारे गोपनियतेचा भंग असल्याचे बोलले जात आहे. दौऱ्यावर असलेल्या अधिकाऱ्यांनी याची पूर्ण कल्पना वरिष्ठांना देणे आवश्यक होते. परंतु ती दिली नसल्याचेही बोलल्या जात आहे.
