कॅन्सरची लस लवकरच बाजारात येणार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा दावा…
कॅन्सरची लसही लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे, असा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केला आहे. ते म्हणाले की, रशियन शास्त्रज्ञ कॅन्सरविरूद्ध लस तयार करण्याच्या जवळ आहेत, जी लवकरच रुग्णांसाठी उपलब्ध होऊ शकते.
पुतिन यांनी रशियात टेलिव्हिजनवर प्रसारित संदेशात म्हणाले आहे की, “आम्ही कॅन्सर रोगावरील लस आणि नवीन पिढीतील इम्युनोमोड्युलेटरी औषधे तयार करण्याच्या अगदी जवळ आहोत. मला आशा आहे की, लवकरच या वैयक्तिक थेरपीच्या पद्धती प्रभावीपणे वापरल्या जातील. मॉस्को फोरम ऑन फ्यूचर टेक्नॉलॉजीजमध्ये बोलताना ते असं म्हणाले आहेत.
ही लस कॅन्सरच्या कोणत्या प्रकारासाठी असेल आणि तिचा परिणाम कसा दिसून येईल, याबाबत व्लादिमीर पुतीन यांनी कोणतीही माहिती दिली नाही. दरम्यान, अनेक देश आणि कंपन्या कॅन्सरची लस बनवण्यावर काम करत आहे. गेल्या वर्षी, ब्रिटीश सरकारने कॅन्सरच्या उपचारांसाठी क्लिनिकल टेस्ट सुरू करण्यासाठी जर्मनी येथील बायोएनटेकशी करार केला होता.
वर्ष 2030 पर्यंत 10,000 रुग्णांपर्यंत पोहोचण्याचे त्याचे लक्ष्य आहे. फार्मास्युटिकल कंपन्या मॉडर्ना आणि मर्क अँड कंपनी देखील प्रायोगिक कॅन्सरच्या लसी विकसित करत आहेत. त्याच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, मेलेनोमामुळे (सर्वात प्राणघातक स्किन कॅन्सर) मृत्यूची शक्यता 3 वर्षांच्या उपचारानंतर निम्मी झाली आहे.
भारताबद्दल बोलायचे झाले तर, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, 2022 मध्ये देशात कॅन्सरच्या 14.1 लाखांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. या आजारामुळे 9.1 लाखांहून अधिक मृत्यू झाले. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (आयएआरएसी) नुसार, ओठ, तोंड आणि फुफ्फुसाचा कर्करोग पुरुषांमध्ये सर्वात सामान्य आहे. स्तनाचा कॅन्सर आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर महिलांमध्ये सर्वाधिक आढळून आला. नवीन प्रकरणांमध्ये त्यांचा वाटा अनुक्रमे 27 आणि 18 टक्के होता. IARC ही WHO ची कॅन्सर आजारावर लक्ष ठेवणारी संस्था आहे.
